hanuman chalisa in marathi

॥ श्री हनुमान चालीसा ॥
॥ दोहा ॥
श्रीगुरुचरणांतील धूलीकणांनी।
निज हृदय दर्पण स्वच्छ करूनी ।
प्रसिद्ध जे चतुर्मोक्षदायी म्हणुनी ।
त्या रघुवीर यशाते वर्णितो
या तनूसी जाणूनी मतिहीन ।
करितो पवनसुता तव स्मरण ।
देउनी मजसी बल बुद्धी ज्ञान।
निरसावे क्लेश विकारही ॥

 

 

॥चौपाई॥

हे हनुमंत कपीश्वर । तू ज्ञान-गुणांचा सागर ।
सर्वत्र तुझा जयजयकार । कीर्ति प्रकट त्रिलोकी ॥ १ ॥
हे अंजनीनंदन पावनसुता। हे परमपावना रामदूता ।
अतुलीत बल तव थोर योग्यता। नसे तुजसम कोणीही ॥ २ ॥
बजरंगबली तू प्रतापवंत। महाविक्रमी विशेष विख्यात ।
दुर्बुद्धीते करूनी नष्ट। सहाय्यक होसी सज्जना॥ ३ ॥
सुवर्णासम तेजस कांती। सुंदर वेष वर्णू किती |
श्रवणी दिव्य कुंडले शोभती। भावती कुरळ कुंतल ते ॥ ४॥

एका हाती वज्र शोभते। अन्य हाती ध्वजा फडकते |
स्कंधी यज्ञोपवीत ते। शोभा वाढवी अनुपम ॥५॥
हे रुद्रअवतार केसरीनंदन। थोर पराक्रम तव यशही महान।
म्हणूनी सकल जगत हे जाण। वंदन करीते तुजलागी ॥ ६ ॥

विद्यावान तू अतिचतुर । श्रेष्ठ गुणांनी युक्त खरोखर ।
सदा रामकार्यं आतुर । सेवारत राहसी ॥७॥
रघुवीर महिमा ऐकण्यात। रममाण होसी कपिश्रेष्ठ ।
श्रीराम, सीता-लक्ष्मणासहित। वास करीती तव हृदयीं ॥ ८ ॥
सूक्ष्म रूपें जाऊनी भली। सीता मातेसी दाविली नवलाई।
विकट रूपें जाळूनी टाकली। लंकानगरी दैत्यांची ॥९॥

धरूनी भयंकर रूपाते। संहारिले असुर कुळांते।
करण्या सफल रामकार्याते । वेचिले निजसर्वस्व तू ॥१०॥
त्वां संजीवनी बुटी आणून। लक्ष्मणासी दिधले जीवदान।
तैं श्रीरामें हर्षित होऊन । आलिंगिले तुजलागी ॥ ११ ॥
मागुती प्रशंसुनी तुजप्रत। वदले मजलागी जैसा भरत।
तैसाच तूही प्रिय अत्यंत। भेद नाही उभयतां ॥ १२ ॥
धन्य धन्य हे कपिश्रेष्ठी। सहस्र मुखें गातील तव कीर्ती।
सद्गदित होऊनी श्रीपति। आलिंगिती पुनः पुनः ॥ १३ ॥
तेव्हापासून हे कपीश्वर। सनकादिक ब्रह्मादी मुनीवर ।
शेष नारद थोर मान्यवर । करिताती तव गुणगान ॥ १४ ॥

तव यशाचे यथार्थ वर्णन। कोणासी नच जमले जाण।
यम कुबेर दिपा विद्वान। सर्वही तेथ बापुडे ॥ १५ ॥

त्वां वानरराज सुग्रीवासी । नेले श्रीराम चरणांसी ।
राज्यपदीं बैसवुनी तयासी । केला बहु उपकार ॥ १६ ॥
तव हितोपदेश ठसला चित्ती । केले तैसेच अनुसरण पुढती।
तेणे बिभीषण लंकाधिपती । झाला, जाणते जगत हे ॥ १७ ॥
सूर्य कोटी योजने दूर। तेथे पोहोचणे अति दुस्तर ।
त्याते समजून फल मधुर। भक्षियले तू क्षणमात्रें ॥ १८ ॥
म्हणूनी रामप्रभूंच्या मुद्रिकेसी। मुखी ठेवूनी त्यासमयासी ।
उल्लंघिले महाजलधिसी। यात नसे आश्चर्य ॥ १९ ॥
या जगती जे जे दुर्गम। कष्टदायी अतिदुस्तर कर्म ।
ते कृपाबळे तव होते सुगम। बा हनुमंता रामदूता ॥ २० ॥
प्रभू रामांच्या महालासी। द्वार रक्षिसी अहर्निशी ।
तव आज्ञेवीण कोणासी । प्रवेश नाही त्यास्थानी ॥ २१ ॥
जे नर तुजसी शरणागत। तयांसी सकल इष्टार्थ प्राप्त।

नच उरते भय व्यथा मनात पाठिराखा तू असतां ॥ २२ ॥
चा तव तेजासी नाही उपमा। ते तूच साहिशी अत्युत्तमा ।
तव गर्जने तिन्ही धामा। हाहाकार तो उठतो ॥ २३॥
हे अंजनेया ! जे सद्भक्त। तव ‘महावीर’ नाम जपतात।
पिशाच्चे न येती तया निकट। ऐसे सामर्थ्य आगळे ॥ २४ ॥

तव माहात्म्य विलक्षण श्रेष्ठा। निरंतर तब नाम जपतां ।
नच उरती रोग व्यथा। निरसती सकल कष्टही ॥ २५ ॥
काया-वाचा-मनें जे भजती। नित्य तब ध्यानी रमती |
त्या भक्तांते दुःख संकटी। सोडवायाते धावसी ॥ २६ ॥
विश्वामाजी श्रीराम वरिष्ठ। नृप वरिष्ठ। नृप तपस्वी सर्वश्रेष्ठ ।
त्वा तयाची कार्ये समस्त । पूर्ण केलीस कपिवरा ॥ २७ ॥
निजकृपेने हनुमंता। पुरविसी सकल मनोरथा ।
अनंत फल देऊनी त्या भक्ता । करिसी धन्य जीवनी ॥ २८ ॥
चारी युगीं उदंड कीर्ती। थोर प्रताप तव सर्व जाणती ।
तुझिया प्रभावे त्रिलोक उजळती ।कायवर्णावे महिमान ॥ २९ ॥
तू साधुसंतांते रक्षिसी। दुष्ट असुरांते निर्दाळीसी ।
अतिप्रिय तू रामासी । महारुद्रा विचक्षणा ॥ ३० ॥
श्री सीतामाईने वर दिधला । तेणे अष्टसिद्धी प्राप्त तुजला ।
अतिउदार तू निजभक्ताला। नवविध निधी देतोसी ॥ ३१ ॥
तुझ्याजवळी राम रसायन। भवरोगावरी उपाय जाण ।
सदा भक्तासान्निध राहून। सांभाळावे त्यालागी ॥ ३२ ॥
करितां आदरे तव भक्ती होय रुजू चा श्रीरामपदा ती।
तेणे आपदा नष्ट होती। जन्मांतरीच्या तत्काळ ॥३३॥
आणि तव कृपेने तयाप्रत । अंती रामलोक होय प्राप्त |
जरी पुनरपि जन्म घेत। रमती हरिभजनी ते॥ ३४ ॥

जे सदभावे तुजला भजती। तयांते सकल सुख प्राप्ती।
त्यांनी अन्य देवतांची भक्ती। कां करावी सांग बरे ॥ ३५ ॥
हे बलभीमा हनुमंता। भावभक्तीने तुजसी स्मरता।
जाती संकटे टळती व्यथा। पळती सर्व पीडाही ॥ ३६॥
जयाजी हनुमंत। तूच माझे इष्टदैवत।
तूच गुरुदेव कृपावंत । शरणागता सांभाळी ॥ ३७॥
हे स्तुतिगान हनुमंताचे । हनुमंताचे। करिता शतावर्तन याचे।
तुटूनी बंधने परमपद साचे। प्राप्त होईल त्या नरा ॥ ३८ ॥
या चाळीस ओव्यांची संगती । देईल सिद्धी भुक्ती मुक्ती।
हनुमान भेटेल तयाप्रती । याते साक्षी सदाशिव ॥ ३९ ॥
हनुमंता ! हा तुलसीदास। असे सदा श्रीहरीचा दास।
तू प्रेरणा द्यावी तयास । हृदयस्थ होऊनी ॥ ४० ॥

 

॥ दोहा ॥
हे मंगलमूर्ती हनुमंत । हे संकट हारक पवनसुत ।
त्वा रामलक्ष्मण सीतेसहित। वास करावा मम हृदयी ॥
तुलसीदासे जे लिहिले। ते हनुमत्कवन मराठीत केले।
सेवारूपी पुष्प वाहिले । ‘जितेन्द्रनाथे’ श्रीचरणी॥
शके एकोणीसशे पंचवीस। वैशाख मासी सीता नवमीस |
शनिवारी संध्यासमयास। झाले संपन्न लेखन हे॥
ही कृपा श्रीरामप्रभूंची। म्हणूनी रचना होय साची ।
या पठणे श्रीहनुमंताची कृपा लाभो भक्तवरां ॥

 ॥ इति जितेन्द्रनाथरचित श्रीहनुमानचालिसा संपूर्ण ॥